भारत आणि न्यूझीलंड भारत (IND vs NZ) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज ऑकलंडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि शुबमन गिल ही जोडी सलामीवीर जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचबरोबर पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. दरम्यान शिखर धवनने आपल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर एक मोठा विक्रम नोंदवला.
शिखर धवनने लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये १२००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तो अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात शिखर धवनने ७२ धावांची शानदार खेळी केली. टीम साऊथीने त्याला बाद करून वनडे क्रिकेटमधील २००वी विकेट मिळवली. शिखर धवनने ७२ धावांच्या खेळीत ७७ चेंडूंचा सामना केला, ज्यात १३ चौकारांचा समावेश होता. सुरुवातीला शिखर धवनने सावध फलंदाजी केली, पण नंतर आक्रमक शैलीत जोरदार फटकेबाजी केली. त्याने कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक झळकावले.
टीम इंडियासाठी लिस्ट-ए सामन्यांमध्ये १२ हजार धावा पूर्ण करणारा शिखर धवन आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम युवराज सिंग, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये २२२११ धावांचा विक्रम इंग्लंडच्या ग्रॅहम गूचच्या नावावर आहे.
या यादीत सचिन तेंडुलकर २१९९९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये २९७ सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने १२०२५ धावा केल्या आहेत, ज्यात ३० शतके आणि ६६ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २४८ धावा आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, ४३.3 षटकानंतर ४ बाद २२४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाकडून शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांनी अर्धशतक झळकावले आहे. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना, लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.