India vs New Zealand 1st ODI Match Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. नवीन वर्षातील दुसऱ्या मालिकेत भारतीय संघाने विजयी सुरुवात करत विश्वचषकाची तयारी पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. टीम इंडियाने शुबमन गिलचे द्विशतकाच्या जोरावर १२ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला होता. मायकेल ब्रेसवेलच्या झुंजार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने देखील ३३७ धावा करत भारतीय संघाचा विजय लांबवला. द्विशतकवीर शुबमन गिलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
युवा फलंदाज शुबमन गिलच्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाहुण्या संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या २८ धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. फिन ऍलन ४० (३९), डेवॉन कॉनवे १०(१६), हेन्री निकोल्स १८(३१), डॅरिल मिचेल ९(१२), टॉम लॅथम २४(४६), ग्लेन फिलिप्स ११(२०), धावा करून बाद झाले. मात्र मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सँटनर यांच्यात दीडशतकी (१६२) भागीदारी झाली. दोघांनी अखेरपर्यत झुंज देत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. ब्रेसवेलने त्याचे शतक पूर्ण करत न्यूझीलंडला विजयाच्या नजीक नेले पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याने ७८ चेंडूत १४० धावा केल्या. मिशेल सँटनरने त्याला साथ देत अर्धशतक साजरे करत ५७ धावा केल्या. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. त्याला शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादवने २ गडी बाद करत साथ दिली. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांना १-१ गडी बाद करण्यात यश आले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला फलंदाजीला आलेल्या युवा शुबमन गिल याने आपला लाजवाब फॉर्म कायम राखला. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावलेल्या गिलने या सामन्यात आणखी एक मोठा पराक्रम करत द्विशतक साजरे केले. वन डे क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
रोहित शर्मा याच्यासह सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्याने ८७ चेंडूवर शतकाला गवसणी घातली. त्यानंतर त्याने आपल्या खेळात अधिक आक्रमण आणत १४५ चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. यामध्ये १९ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता.
भारतीय डावाबाबत सांगायचे झाल्यास रोहित शर्माने ३४(३८), सूर्यकुमार यादव ३१(२६), हार्दिक पांड्या ३८(२८) आणि वॉशिंग्टन सुंदर १२(१४) यांनाच केवळ गिल व्यतिरिक्त दोन आकडी धावसंख्या गाठता आली. तर विराट कोहली आणि इशान किशन अनुक्रमे अवघ्या ८ आणि ५ धावा करून बाद झाले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हेन्री शिपले आणि डॅरिल मिचेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.