India vs New Zealand: श्रीलंकेनंतर न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला भारताविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच, भारतीय संघात महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यात अखेर द्विशतकवीर इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारताला नंबर वन बनण्याची संधी आहे. पण, मालिकेआधीच श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. अशात सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही रोहित शर्मा आज कोणता संघ निवडतो याची उत्सुकता होतीच पण त्याने इशान किशनला संघात स्थान दिले.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “ द्विशतकवीर इशान किशनला संघात स्थान देता येत नव्हते तेव्हा फार वाईट वाटत होते. यामुळे माझ्यावर दबावही वाढत होता. सलामीला असणाऱ्या शुबमन गिलने श्रीलंकेविरुद्ध शतक करून आपली दावेदारी पक्की केली आहे. त्यामुळे इशानला मधल्या फळीत चोथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळायला लागू शकते.”
इशान किशन शक्यतो सलामीलाच खेळतो, मात्र रोहित शर्मा आणि शुबमन गिलमुळे त्याला संधी मिळत नव्हती. पण केएल राहुलचे लग्न आणि अय्यरची दुखापत त्याच्या पथ्यावर पडली. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळताना त्याने ६ अर्धशतके झळकावली असल्याने त्याला मिळालेल्या संधीचे सोने करता येईल. न्यूझीलंडचा संघ केन विलियम्सन व टिम साऊदी यांच्याशिवाय भारतात दाखल झाला आहे. पण, त्यांनी पाकिस्तान दौऱ्यावर वन डे मालिका जिंकत आत्मविश्वास कमावला आहे आणि तिच कामगिरी येथे कायम राखण्याचा किवींचा प्रयत्न असणार आहे. टॉम लॅथम या दौऱ्यावर किवींचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड संघ
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर