भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकाची तयारी ही भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या याच मालिकेपासून सुरु केली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले. टी२० मध्ये शानदार प्रदर्शन केलेला डावखुरा स्विंग गोलंदाज अर्शदीप सिंग आणि भारताची तोफ समजल्या जाणाऱ्या वेगवान गोलंदाज उमरान मलिक या दोघांना आजच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले.
टीम इंडियाने या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंसह प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याची संधी आहे. न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली असून कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली आहेत. शुबमन गिल अर्धशतक पूर्ण करताच बाद झाला त्याने ६५ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ शिखर धवनही ७७ चेंडूत ७२ धावा करून बाद झाला. त्या दोघांनी १२४ धावांची सलामी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी भक्कम पाया रचला आहे.
उमरान मलिक आणि अर्शदीप मलिक पदार्पण
उमरान मलिक हा देखील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग होता पण त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. काश्मीरचा रहिवासी असलेला उमरान १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर उमरान मलिकला टीम इंडियामध्ये प्रवेश मिळाला. त्याने टीम इंडियासाठी तीन टी२० सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला १२.४४ च्या इकॉनॉमीसह त्याने धावा देऊन केवळ दोन गडी बाद केले होते त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. आता तो पहिल्यांदाच भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग बनला आहे.
आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग किंवा उम्रान मलिक यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता होती, परंतु आज दोघंही पदार्पण करत आहेत. शिखऱ धवन व शुबमन गिल ही जोडी सलामीला येणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल व उमरान मलिक असा भारताचा अंतिम अकरा संघ आहे.
भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
न्यूझीलंड संघ
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन