भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, ७ बाद ३०६ धावा केल्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज टीम साऊथीने शिखर धवनला बाद करत एक मोठा विक्रम केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडला ३०७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर फलंदाज शबमन गिलने ५० आणि कर्णधार शिखर धवनने ७२ धावा केल्या. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची मोठी भागीदारी केली. टीम साऊथीने शिखर धवनला बाद करत भारतीय संघाला दुसरा धक्का दिला. त्याचबरोबर त्याने ही विकेट घेत एक मोठा विक्रम केला. कारण यासोबतच त्याच्या वनडेतील २०० विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर ही त्याने शार्दुल ठाकुर आणि श्रेयस अय्यरला बाद केले.
जगातील एकमेव गोलंदाज ठरला –
न्यूझीलंडचा ३३ वर्षीय वेगवान गोलंदाज टीम साऊथी हा कसोटीत ३०० हून अधिक, वनडे सामन्यात २०० हून अधिक आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेणारा जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याने १४८ वनडे सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने १९९ विकेट घेतल्या होत्या. ३३ धावांत ७ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ५ वेळा ४ विकेट आणि ३ वेळा ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या दरम्यान त्याची इकॉनॉमी ५.४३ अशी राहिली आहे.
हेही वाचा – SL vs PAK: कसोटी सामन्यावर फिक्सिंगचे आरोप; आयसीसी करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
टीम साऊथीची कामगिरी –
टीम साऊथीने आतापर्यंत ८८ कसोटी सामन्यांच्या १६६ डावांमध्ये २९ च्या सरासरीने ३४७ विकेट्स घेतल्या आहेत. ६४ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. १४ वेळा ५ तर एकदा १० विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० इंटरनॅशनलच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर साऊथीने १०७ मॅचमध्ये १३४ विकेट घेतल्या आहेत. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. १८ धावांत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकदा ४ आणि एकदा ४ विकेट्स घेतल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.