भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st ODI) आज ऑकलंड येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. ज्यामुळे आता न्यूझीलंडने मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली आहे.
भारताने न्यूझीलंडला ३०७ धावांचे लक्ष्य दिले होते. जे न्यूझीलंड संघाने टॉम लॅथमच्या शतकाच्या जोरावर ४७.१ षटकांत पार केले. त्याने केन विल्यमसन सोबत चौथ्या विकेट्साठी विक्रमी २२१ धावांचा भागीदारी रचली. तसेच नाबाद शतकी खेळी करणाऱ्या टॉम लॅथमने एका मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारतीय संघाने ५० षटकात ७ बाद ३०६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने शानदार शतक झळकावत आपल्या संघाची धावसंख्या गाठली आणि नवा विक्रमही केला. लॅथमने १०४ चेंडूत १४५ धावा केल्या.
लॅथमने ७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७वे शतक आहे आणि भारताविरुद्धच्या वनडेमध्ये न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. लॅथम आणि केन विल्यमसन यांच्यातील वनडेतील ही सर्वोच्च भागीदारी आहे.