टी२० विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक होता मात्र पावसामुळे ही उत्सुकता आणखी पुढे ढकलली गेली आहे. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी२० फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहेत, पण चुकांमधून धडा घेतलेला नाही. २०२१ साली युएई मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. आता ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत दहा गडी राखून पराभूत होऊन जेतेपद पटकावण्यापासून संघ वंचित राहिला. त्यामुळे २०२४ साली वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या पुढील टी२० विश्‍वकरंडकाची तयारी या लढतीपासूनच सुरू होणार होती मात्र आता अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचा यावेळी कस लागणार हे निश्चित.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) सुरू झाला. उभय संघांतील हा पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. हवामान खात्याने सामन्याच्या वेळी पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला होता, जो अगदी खरा ठरला. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.

वेलिंग्टनमध्ये मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही, त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील चार-पाच तास पाऊस थांबण्याची शक्यता नाही. मात्र, कट ऑफ वेळेपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार कट ऑफ वेळ ही २.१७ सांगण्यात आली होती. तत्पूर्वी नाणेफेक सकाळी ११.३० वाजता होणार होती, ती होऊ शकली नाही. हा सामना दुपारी १२ वाजता सुरू होणार होता, पण तोही होऊ शकला नाही. आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ २० नोव्हेंबरला मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना माऊंट मौनगानुई येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st t20 india new zealand 1st t20 match cancelled due to rain without toss avw