न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी सलग दुसऱ्या दिवशी सुरु राहिली. पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ वाया गेला. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारताने पहिल्या दिवसाअखेरीस १२२ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत या जोडीकडून संघाला मोठ्या आशा होत्या, मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्यांचीही डाळ शिजू शकली नाही.

ऋषभ पंतच्या रुपाने दुसऱ्या दिवशी भारताला पहिला धक्का बसला. अजिंक्य रहाणेने एका धावेसाठी फटका खेळला, यावेळी धाव घेण्यावरुन दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. या गोंधळात ऐजाझ पटेलने केलेल्या अचूक फेकीमुळे पंत धावबाद झाला. दरम्यान, आपल्या कसोटी कारकिर्दीत साथीदाराला धावबाद करण्याची अजिंक्य रहाणेची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

अजिंक्य कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदाही धावबाद झालेला नाही. मात्र दुर्देवाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात रहाणेच्या नावावर या नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेला अर्धशतकानेही हुलकावणी दिली. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक वॉटलिंगने त्याचा झेल घेतला. १३८ चेंडूत ५ चौकारांसह अजिंक्यने ४६ धावा केल्या.

Story img Loader