न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. न्यूझीलंडला २७३ धावांत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर यांनी मोक्याच्या क्षणांमध्ये टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले. जसप्रीत बुमराहला मात्र या सामन्यात एकही बळी मिळाला नाही.
अवश्य वाचा – Video : सर जाडेजांचा अचूक थ्रो आणि फलंदाज माघारी
दरम्यान वन-डे क्रिकेटमध्ये सलग तिसऱ्या वन-डे सामन्यात बुमराहला एकही बळी मिळालेला नाही. आतापर्यंतच्या बुमराहच्या कारकिर्दीत ही गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.
Bumrah’s Last 3 Odis
0/38 vs Aus
0/53 vs NZ
0/64 vs NZ*For 1st time, He remained wicketless in 3 Consecutive odis#NZvIND
— CricBeat (@Cric_beat) February 8, 2020
दरम्यान, नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर चहलने निकोल्सला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.
मार्टीन गप्टीलने रॉस टेलरसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गप्टीलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूरच्या अचूक थ्रो-वर गप्टील धावबाद झाला. त्याने ७९ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. अखेरीस अनुभवी रॉस टेलरने कायल जेमिन्सनच्या साथीने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. टेरलच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २७३ धावांचा टप्पाही गाठला. रॉस टेलरने नाबाद ७३ धावांची खेळी केली.