भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार आहे. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात बदल केला आहे. न्यूझीलंड संघात दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी मायकेल ब्रेसवेलला स्थान देण्यात आले. तसेच भारतीय संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागी अष्टपैलू दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला असून शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. शार्दूल ठाकूरला पाठीचा त्रास अधिक जाणवत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामना सुरु होण्याआधी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खूप पाऊस पडला असल्याने मैदान ओलसर झाले होते. त्यामुळे नाणेफेकीला देखील विलंब झाला. १५ मिनिटे उशिराने सामन्याला सुरुवात झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.४५ मिनिटांनी नाणेफेक न होता ती ७.०० वाजता झाली. पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे सध्या सामना थांबला असून पहिल्या पाच षटकात भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन हा २ धावांवर तर शुबमन गिल हा १९ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा :   IND vs NZ 2nd ODI: करो या मरो! मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक, कशी असेल प्लेईंग ११ जाणून घ्या

तत्पूर्वी, ऑकलंडमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. ३०६ धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी भारतासमोर अडचणी निर्माण केल्या आणि लक्ष्य सहज गाठले. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या सामन्यातील चुका सुधारून चांगली गोलंदाजी करणे गरजेचे आहे.