न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ २५१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. फलंदाजीत महत्वाच्या खेळाडूंचं अपयशी ठरणं भारतीय संघाला भोवलं. श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा आणि नवदीप सैनी दुसऱ्या सामन्यात फटकेबाजी करत चांगले प्रयत्न केले, पण त्यांची झुंज अपयशी ठरली.

रविंद्र जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान जाडेजाने धोनीचा विक्रम मोडला. वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जाडेजा पहिल्या स्थानी पोहचला आहे.

याचसोबत न्यूझीलंडविरुद्ध गेल्या ५ वन-डे सामन्यांमध्ये केवळ एका सामन्याचा अपवाद वगळता जाडेजाची कामगिरी चांगली राहिलेली आहे.

पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.

Story img Loader