भारत आणि न्यूझीलंड संघांतील दुसरा वनडे सामना आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.कर्णधार रोहित शर्मा आणखी एका विक्रमाचे लक्ष्य असणार आहे. हा विक्रम वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंशी संबंधित आहे. त्याला ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीच्या क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे.
जर आजच्या सामन्यात हिटमॅनच्या बॅटमधून ६ षटकार निघाले, तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप ३ फलंदाजांच्या यादीत सामील होईल. जर रोहित शर्माने असे केले, तर केवळ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी त्याच्यापुढे राहतील. सध्या या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे.
रोहित शर्माच्या नावावर २३९ वनडे सामन्यात २६५ षटकारांची नोंद आहे. आज जर त्याने न्यूझीलंडविरुद्ध ६ षटकार मारले, तर रोहित श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याला मागे टाकून टॉप ३ मध्ये स्थान मिळवेल. जयसूर्याने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या ४४५ वनडे सामन्यांमध्ये २७० षटकार लगावले आहेत. दुसरीकडे, ख्रिस गेल (३५१ षटकार) आणि शाहिद आफ्रिदी (३३१ षटकार) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
हेही वाचा – ‘जर एक मालिका गमावली म्हणून हटवले, तर….’, कपिल यांचा बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना हार्दिकबद्दल कडक इशारा
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज