भारताने शनिवारी दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या १०९ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने २०.१ षटकांत सामना जिंकला. विजयानंतर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये तो स्वत:बद्दल देखील बोलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, “गेल्या पाच सामन्यांमध्ये मी गोलंदाजांवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की माझ्याकडून मोठी धावसंख्या आलेली नाही. पण मी माझ्या फलंदाजीने खूश आहे.”

तसेच गोलंदाजांचे कौतुक करताना म्हणाला, “मागील काही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः भारतात अशी गोलंदाजी करणे सोपे नाही. या खेळाडूंकडे कौशल्य आहे आणि ते खूप मेहनत घेत आहेत. त्यांना यश मिळत आहे हे पाहून खूप आनंद होतो.”

रोहित पुढे म्हणाला, “आम्ही काल सराव केला तेव्हा चेंडू वळत होता. आम्हाला माहित होते की, जर त्यांनी २५० धावा केल्या तर आमच्यासमोर आव्हान असेल. पहिल्या सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि आज लक्ष्याचा पाठलाग केला. इंदूरमध्ये आम्ही काय करणार हे मला माहीत नाही. या पाच सामन्यांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली आहे. संघात उत्साहाची लाट असून चांगले वातावरण आहे. शमी आणि सिराजला आणखी गोलंदाजी करायची होती. पण मला त्यांना सांगावे लागले की कसोटी मालिका येत आहे आणि इतर गोलंदाज आहेत.”

हेही वाचा – ‘सलामीवीर म्हणून शुबमनला विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू देऊ शकतो आव्हान’,संजय बागर यांचे वक्तव्य

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५० चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि २ षटकार लगावत ५१ धावा केल्या. त्याचबरोबर शुबमन गिलने नाबाद ४० धावांचे योगदान दिले.

भारतीय संघाकडून गोलंदाजीमध्ये देखील शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ६ षटकांत १८ धावा दिल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 2nd odi rohit sharma said after match i am trying to dominate the bowlers vbm
Show comments