India vs New Zealand 2nd T20 Playing 11, Pitch Report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२० नोव्हेंबर) होणार आहे. माउंट मांउगानुई येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. वेलिंग्टनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडण्याची भीती चाहत्यांना आहे. दुसऱ्या सामन्यासाठीही चांगली बातमी नाही. माउंट मांउगानुई येथेही पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुसऱ्या टी२० सामन्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. असे झाल्यास हा सामनाही पावसामुळे रद्द होईल. माउंट मांउगानुई येथे तापमान १५-२१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. AccuWeather नुसार, दिवसभर ढगाळ वातावरण असेल. सकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे, जो दुपारपर्यंत जोरदार होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान माउंट मांउगानुईमधील बे ओवल या ठिकाणी होणार आहे. माउंगानुई या ठिकाणी सध्या रिमझिम पाऊस सुरू असून सामन्याच्या दिवशी पावसाची जास्त शक्यता. या सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता दिवसा ८९ टक्के तर रात्री ४२ टक्के आहे. भारत आणि न्यूझीलंड संघादरम्याचा हा सामना रात्री असून पाऊस होण्याची पुरेपुर शक्यता आहे. जर भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना देखील पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला तर तिसरा सामना निर्णायक ठरणार आणि तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही खिशात घालेल. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता माउंट मौनगानुई येथे सामना सुरू होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. सायंकाळी चारच्या सुमारास पावसाचीही शक्यता आहे. त्यानंतर सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्लेइंग-११ मध्ये हवामानाचा परिणाम दिसून येईल
संपूर्ण सामन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आपली प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्यापूर्वी भारताला सावधगिरी बाळगावी लागेल. भारताने दोन फिरकी गोलंदाजांऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन जावे. अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांचा प्लेइंग-११ मध्ये समावेश होण्याची खात्री आहे. संघात परत बोलावलेल्या उमरान मलिकलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज निवडीसाठी उपलब्ध आहेत. कर्णधार हार्दिक पंड्याही वेगवान गोलंदाजी करतो. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला संघात स्थान मिळते की दोघांनाही स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुड्डा दोघांपैकी एकाला ते मिळू शकते.
पिच रिपोर्ट
न्यूझीलंडमध्ये अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत असले तरी माउंट मांउगानुईची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या केवळ १६२ धावांची आहे. येथे मागील ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे. बहुतांश प्रसंगी हा विजय मोठ्या धावांच्या फरकाने मिळाला आहे. म्हणजेच या विकेटवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते, असे म्हणता येईल.
सामना कुठे आणि कधी पाहू शकणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.०० वाजता सुरु होणार आहे. हा सामना तुम्हाला अमेझॉन प्राइमवर लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ अॅपवर पाहू शकता. तसेच दूरदर्शनच्या डी डी स्पोर्ट्सवर देखील तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ॠषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर