सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३३ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ७ गडी राखत भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
ऑकलंडच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग तिसरा टी-२० विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे.
India at Eden park, Auckland (T20I)
W W W*
1st Asian team to win 3 Consecutive T20Is at this venue#NZvsIND
— CricBeat (@Cric_beat) January 26, 2020
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट यष्टीरक्षक सेफर्टकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून लोकेश राहुलने नाबाद ५७ तर श्रेयस अय्यरने ४४ धावा केल्या.
अवश्य वाचा – Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…