IND vs NZ India lost two Tests in a row for the third time in 24 years : न्यूझीलंडने पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यांत ११३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. किवी संघाने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाकडून पुनरागमन करण्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला ते करण्यात अपयश आले. या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी ३५९ धावांच्या लक्ष्याला दिले होते. प्रत्युत्तर देताना टीम इंडिया दुसऱ्या डावात २४५ धावांवर आटोपली आणि सलग दुसरा सामना गमावत २४ वर्षांत तिसऱ्यांदा लाजिरवाणा विक्रम केला.

भारतीय संघ सलग दोन कसोटीत पराभूत –

भारताने मायदेशात सलग दोन कसोटी गमावल्या आहेत. २०१२ नंतर टीम इंडियाने मायदेशात सलग दोन कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१२ मध्ये, इंग्लंडने वानखेडेवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत आणि ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव केला हो. २००० नंतर २४ वर्षात टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या आधी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. २००० मध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाला होता. त्यावेळी आफ्रिकन संघाने वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचा पराभव केला होता.

भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली –

भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यासह घरच्या भूमीवर सलग १८ कसोटी मालिका जिंकल्यानंतर विजयी मालिका खंडित झाली. शेवटच्या वेळी टीम इंडियाला २०१२-१३ मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर भारताने सलग १८ मालिका जिंकल्या. मात्र, आता न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करून ही विजयाची मालिका खंडित केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका

किवी संघ भारतीय भूमीवर एवढी प्रभावी कामगिरी करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला होता. आता प्रथमच त्याने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी १९५५ मध्ये खेळली गेली आणि दोन्ही देशांच्या ६९ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाने भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली.

हेही वाचा – IND vs NZ : यशस्वीने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम; सीनिअर खेळाडूंची मोडली सद्दी

काय घडलं सामन्यात?

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. यानंतर १०३ धावांच्या आघाडीनंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि एकूण ३५८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने ४२ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय कोणताही फलंदाज २५ हून अधिक धावा करू शकला नाही. न्यूझीलंडसाठी मिचेल सँटनरने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा अशा एकूण १४ विकेट्स घेतल्या.