IND vs NZ 2nd Test Match Updates : टीम इंडियाने पुण्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये जोरदार पलटवार केला. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या भक्कम फिरकी गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पुनरागमन केले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ केवळ २५५ धावा करू शकला. आता टीम इंडियाला विजयासाठी ३५९ धावा कराव्या लागणार आहेत.

डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सात विकेट्स घेतल्या. यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात १५६ धावांत आटोपली. अशाप्रकारे किवी संघाला पहिल्या डावाच्या जोरावर १०३ धावांची मोठी आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावात न्यूझीलंडने २५५ धावा केल्या असून भारताला ३५९ धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी –

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथमने सर्वाधिक ८६ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे १७, विल यंग २३, रचिन रवींद्र ९ आणि डॅरिल मिशेल १८ धावा करून बाद झाले. टॉम ब्लंडेल (४१) आणि ग्लेन फिलिप्स (४८) यांच्यात सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी झाली. मात्र तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी अवघ्या एका तासात पाच विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळल. मात्र, ग्लेन फिलिप्स ४८ धावांवर नाबाद परतला. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, वॉशिंग्टन सुंदरने चार आणि रविचंद्रन अश्विनने दोन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का निवड करण्यात आली नाही? जाणून घ्या

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने पाच गडी गमावून १९८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी किवी फलंदाजांनी पहिल्या १५ मिनिटांत सहज धावा केल्या. किवी संघ भारताला डोंगराएवढे लक्ष्य देईल असे वाटत होते, पण त्यानंतर रवींद्र जडेजाने टॉम ब्लंडेलला बोल्ड केले. तो तीन चौकारांच्या मदतीने ४१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मिचेल सँटनर ४, टीम साऊथी 0 , एजाज पटेल १ धावांवर आणि विल्यम ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. फिलिप्स चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा करून नाबाद परतला.