सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ५ गडी गमावले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत ४९ धावा केल्या.
निल वँगर आणि कायल जेमिसन जोडीने नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे यजमानांनी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. अखेरीस मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीवर वँगरला माघारी धाडत न्यूझीलंडची ही जोडी फोडली. सीमारेषेवर रविंद्र जाडेजाने हवेत उडी मारत एका हातात भन्नाट झेल टिपला. हा झेल घेतल्यानंतर भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी जाडेजाचं कौतुक केलं. पाहा हा व्हिडीओ…
Short of words for this guy @imjadeja #NZvsIND #Jadeja pic.twitter.com/yGNu94Lu5S
— Adish Shetty (@AdishShetty18) March 1, 2020
पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, रविंद्र जाडेजाने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.