ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारतीय संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडवर ७ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी यांच्या भन्नाट माऱ्यासमोर भारतीय संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या असून सध्या भारतीय संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल हे सर्व फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले.
अवश्य वाचा – आई-बाबांच्या कष्टामुळेच आज मी यशस्वी, अजिंक्यने उलगडला आपला संघर्षमय प्रवास
भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहनेही विशेषकरुन अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. भारताच्या आघाडीच्या फळीतले फलंदाज माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रहाणे जोडी मैदानात होती. काही वेळापर्यंत दोन्ही फलंदाजांनी भारताचा गड व्यवस्थित सांभाळला. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या गोलंदाजांना अजिंक्यविरोधात आखुड टप्प्याचे चेंडू टाकण्याचा इशारा केला. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी रहाणे-पुजारा जोडीला कधी आखुड टप्प्याचे तर कधी बाऊंसर चेंडू टाकत हैराण केलं. निल वँगरच्या अशाच एका चेंडूवर अजिंक्य फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला.
यावेळी समालोचन करत असलेल्या हरभजनने अजिंक्यच्या या खेळाविषयी नाराजी व्यक्त केली. हरभजन सिंहच्या मते अजिंक्यने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही. तो एखाद्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजापेक्षा तळातल्या फळीतल्या फलंदाजासारखा खेळत होता. अजिंक्यची ही आतापर्यंत सर्वात खराब खेळी असून निल वँगरने त्याला ज्या पद्धतीने बाद केलं ते पाहता, मैदानावर कोणीतरी अखेरचा फलंदाज खेळत आहे असं वाटतं होतं. दरम्यान तिसऱ्या दिवशी हनुमा विहारी आणि ऋषभ पंत जोडीवर भारतीय संघाची मदार आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.