IND vs NZ 3rd New Zealand defeated India by 25 runs and gave a clean sweep in the three match series : न्यूझीलंडने सलग तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा दारुण पराभव करत कसोटी मालिकेत पहिल्यांदाच व्हाइट वॉश दिला आहे. मुंबई कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात घातली. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब राहिली. भारतीय संघ मायदेशात नाही तर परदेशात खेळतोय असे वाटत होते. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटी सामन्यात 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 24 वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात पहिल्यांदाच क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले आहे. याआधी टीम इंंडियाला 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या वेळी क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. ज्यामुळे भारताकडे 28 धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर संपला आणि त्यांनी एकूण 146 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघ 121 धावांवरच मर्यादित राहिला. भारताकडून ऋषभ पंतने दुसऱ्या डावात सर्वाधिक 64 धावा केल्या, तर न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 ने व्हाइट वॉश दिली. मायदेशात झालेल्या दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दुसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. त्याचबरोबर घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला प्रथमच क्लीन स्वीप मिळाला आहे.
न्यूझीलंडचा भारतात ऐतिहासिक विजय –
न्यूझीलंड संघाने या मालिका विजयासह इतिहास घडवला आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली इतकेच नाही तर टीम इंडियाला क्लीन स्वीपही दिला. न्यूझीलंडने 12 वर्षांनंतर भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यास भाग पाडले आणि घरच्या मैदानावर सलग 18 मालिका विजयांची मालिकाही खंडित केली. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने ही कसोटी मालिका केन विल्यमसनशिवाय खेळली आहे. तसेच, टॉम लॅथम प्रथमच संघाचे नेतृत्व करत होता. असे असतानाही किवी संघाने कामगिरीत कोणतीही कसर सोडली नाही.