IND vs NZ 3rd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांचा तिसरा सामना उद्या ३० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय सामन्यांमध्ये उतरली आहे. यात पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता, तर दुसरा सामना पावसाच्या संततधारेमुळे रद्द करण्यात आला होता. आता पुढील सामन्यात टीम इंडियाला टिकून राहण्यास विजय प्राप्त करणे आवश्यक आहे अन्यथा न्यूझीलंड २-० च्या फरकाने किंवा सामना रद्द झाल्यास १-० च्या फरकाने विजयी होऊ शकतो. या सामन्याआधी भारतीय स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक विषयी मोठे विधान केले आहे.
टी २० विश्वचषकात अर्शदीप हा टीम इंडियासाठी सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला होता, तर आता सुरु असणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात उमरान मलिकची जादू दिसून येत आहे. अर्शदीप व उमरान दोघांचे करिअर काहीश्या समान वेळी सुरु झाले असले तरी त्या दोघांची शैली अत्यंत वेगळी आहे. अर्शदीप हा भेदक यॉर्कर्ससाठी ओळखला जातो तर उमरान हा १५०-१५५ च्या वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जगभरात नावाजलेला गोलंदाज आहे. अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की अर्शदीप आणि उमरान भविष्यात भारताच्या वेगवान गोलंदाजी युनिटचा मुख्य भाग बनू शकतात.
IND vs NZ 3rd ODI आधी काय म्हणाला अर्शदीप सिंग?
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या आधी अर्शदीपने उमरानच्या गोलंदाजीचा आपल्यालाही फायदा होत असल्याचे सांगितले आहे. अर्शदीप म्हणाला की, “उमरानच्या आजूबाजूला राहणे हे खूप मस्त वाटते, त्याला विनोद करायला आवडतात त्याचा व माझा स्वभाव सारखाच आहे, आणि राहिला प्रश्न गोलंदाजीचा तर त्याच्यामुळे मला खूप फायदा होतो. जेव्हा उमरान १५५ किमी/ताशीच्या वेगाने गोलंदाजी करतो आणि मग माझा वेग थेट १३५ पर्यंत कमी होतो तेव्हा फलंदाज गोंधळतात. आमची ही भागीदारी मैदानाबाहेरही अशीच हसत खेळत राहील असा आमचा प्रयत्न असतो.
हे ही वाचा<< Video: हार्दिक पांड्याच्या पार्टीत धोनीचा जलवा; डान्स पाहून पांड्याच्या बायकोची ‘ती’ कमेंट चर्चेत
दरम्यान, एकदिवसीय सामना (ODI) हा एक लांबलचक खेळ आहे, यात फलंदाजीप्रमाणेच, गोलंदाजीमध्येही भागीदारी महत्त्वाची असते. मी नेहमी माझया सह असणाऱ्या गोलंदाजांचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जर तो चांगली गोलंदाजी करत असेल, तर त्यातून अधिक फायदा होतो. मग मी फक्त धावा थांबवण्याचा प्रयत्न करून त्याला साथ देतो. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. जर मी आक्रमण केले तर दुसऱ्या टोकाला असलेला माझा जोडीदार बचाव करावा लागेल .”असेही पुढे अर्शदीप म्हणाला.