आज भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर आजचा दिवस कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे. कारण २४ जानेवारी २०१३ रोजी, त्याने प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी केली होती. आज त्याने सलामीवीर म्हणून १० वर्षे पूर्ण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत खेळायचा आणि सतत अपयशी ठरत होता. त्याचवेळी माजी कर्णधार एमएस धोनीने २०१३ मध्ये रोहितला वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीराची जबाबदारी दिली होती. मात्र, धोनीनेच त्याला सलामीवीर म्हणून आजमावण्याचा निर्णय घेतला, असेही म्हणता येईल. तेव्हापासून रोहितने ही अप्रतिम संधी दोन्ही हातांनी स्वीकारली आणि अनेक मोठ्या संघांविरुद्ध सलामीवीर म्हणून धावा केल्या. त्यानंतर रोहितला वनडेसाठी कायमस्वरूपी सलामीवीर बनवण्यात आले.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहितला सलामीवीर म्हणून 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. द्रविड म्हणाला की, “रोहित शर्मा एक महान फलंदाज आहे. मला आठवते की, मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते, जेव्हा तो १७ किंवा १८ वर्षांचा होता. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी अंडर-१९ खेळायला गेला होता. १९ वर्षांची अशी अनेक मुलं होती, तरी एवढी मोठी कामगिरी प्रत्येकाला करता येत नाही. जे रोहित शर्माने केले आहे.”

तो पुढे म्हणाला की, “रोहित शर्मा जवळपास १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेटसाठी खेळत आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. १० वर्षांपूर्वी त्याला पहिल्यांदा सलामीची संधी मिळाली तेव्हा त्याचे नशीब उजळले. त्याने आयसीसीसारख्या मोठ्या स्पर्धेत धावा करून नाव कमावले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत आणि अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच फलंदाज आहे, हे खूपच खास आहे.”

हेही वाचा – SAT20: राशिद खानने रचला इतिहास; दिग्गजांना मागे सोडत ‘ही’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला, पाहा VIDEO

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याची एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६४ धावांची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच वेळी, त्याने २४० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.६५ च्या प्रभावी सरासरीने ९६८१ धावा केल्या आहेत. याशिवाय रोहितने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या एका स्पर्धेत पाच शतके झळकावली आहेत. तो अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi rohit sharma completed 10 years as an opener in odi cricket vbm