मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमारने एक मोठा विक्रम केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ९ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने या छोट्या खेळीत दोन षटकार लगावले. ज्यामुळे त्याने षटकार लगावण्याच्या बाबतीत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने या बाबतीत हार्दिक पांड्या आणि एमएस धोनीलादेखील मागे सोडले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, रोहित आणि शुबमनने पहिल्या गड्यासाठी २१२ धावांचे भक्कम भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ८५ चेंडूत १०१ धावा काढून बाद झाला. त्याचबरोबर शुबमनदेखील ७८ चेंडूत ११२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याने ५४ धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर फलंदाज खास कामगिरी करताना आली नाही. त्यामुळे भारताने न्यूझीलंडला ३८६ धावांचे लक्ष्य दिले.
तिसऱ्या वनडेत सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चालली नाही. पाचव्या क्रमांकावर उतरल्यानंतर त्याने ९ चेंडूत फक्त १४ धावा केल्या. त्याने आपल्या छोट्या खेळीत दोन षटकार लगावले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारही पूर्ण केले आणि इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारणारा सूर्या भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
‘मिस्टर 360’पूर्वी हा विक्रम अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नावावर होता. हार्दिकने १०१ डावात १०० आंतरराष्ट्रीय षटकार लगावले होते. त्याचबरोबर सूर्याने अवघ्या ६१ आंतरराष्ट्रीय डावात हा पराक्रम केला. १०० पेक्षा कमी डावात शंभर षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.
माजी कर्णधार एमएस धोनी सर्वात जलद १०० आंतरराष्ट्रीय षटकार ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याने १३२ डावात अशी कामगिरी केली होती. तसेच सुरेश रैना आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी १६६ डावात १०० षटकार लगावले आहेत.
हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्माच्या शतकानंतर सूर्यकुमार यादवची भन्नाट रिअॅक्शन; पाहा VIDEO
३८६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या न्यूझीलंडने ३५ षटकांच्या समाप्तीनंतर ६ बाद २५५ धावा केल्या आहेत. अजून त्यांना ९० चेंडूत १३१ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १०० चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकार लगावत १३८ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकुरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.