न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने २-० विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर दोन्ही संघात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी अनेक अर्थांनी खास आहे. जर टीम इंडियाने कांगारूंना धूळ चारली, तर ते सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील.
त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेला मुकावे आणि रणजी ट्रॉफी खेळावी, अशी वसीम जाफरची इच्छा आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही काही दिवसापूर्वी विराट कोहलीला असा सल्ला दिला होता.भारताला २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. तसेच त्याच दिवशी रणजी ट्रॉफीचे पुढचे सामने खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा सराव करायचा असेल, तर त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्याला मुकावे लागेल.
हेही वाचा – IND vs NZ ODI: टीम इंडियाच्या ‘या’ स्टाईलने रमीझ राजा प्रभावित; म्हणाले, ‘पाकिस्तानसह इतर संघांनीही…’
वसीम जाफरने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, ”मला वाटते (रणजी ट्रॉफी खेळणे) खूप अर्थपूर्ण असेल. जर तो एक रणजी सामना खेळला तर त्यांना दोन डाव मिळतील जे नक्कीच मदत करेल. तुम्ही कितीही अनुभवी असलात, तरी तुम्हाला सामन्याच्या वेळेची गरज असते, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये. तुम्ही पहिली कसोटी खेळता तेव्हा तुम्ही अंडरकुक होऊ इच्छित नाही.”
जाफर पुढे म्हणाले, ‘ही सर्व दृष्टिकोनातून मोठी मालिका आहे, मग ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) ची अंतिम फेरी असो की भारताला जगातला नंबर वन कसोटी संघ बनायचे असो. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताला जे काही करता येईल ते करणे आवश्यक आहे. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. रोहित आणि इतर अनेक खेळाडूंचीही तीच अवस्था आहे.”
हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI सामन्यानंतर आयसीसीची मोठी घोषणा; भारतीय संघ नंबर वन टीम होण्यापासून फक्त एक पाऊल दूर!
भारताने बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली, ज्यामध्ये विराट कोहली आणि केएल राहुलसारखे खेळाडू छाप पाडण्यात अपयशी ठरले होते. त्याचवेळी रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर होता. रोहित शर्माने मार्च २०२२ मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती.