अहमदाबाद येथे खेळल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर टीम इंडियाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी विजय नोंदवताना मालिका देखील आपल्या नावावर केली. या विजयात भारतीय युवा फलंदाज शुबमन गिलच्या शतकाचे योगदान खूप महत्वाचे होते. अशात माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शुबमन गिलच्या शतकावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्रा म्हणाला की, टी-२० क्रिकेटर म्हणून मला शुबमन गिलबद्दल इतका विश्वास नव्हता, पण आता तो चुकीचा सिद्ध झाला आहे. त्यामुळे आकाश चोप्राने आपले शब्द मागे घेतले आहेत. कारण शुबमन गिलने ६३ चेंडूचा सामना करताना १२६ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान शुबमन गिलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ”तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो की शुबमन गिल आता टी-२० क्रिकेटर बनला आहे का? मी माझ्या हृदयावर हात ठेवून म्हणतो की मला वाटले होते, तो कसोटी क्रिकेट खूप चांगला खेळतो.”
चोप्रा पुढे म्हणाला, ”एकदिवसीय हा त्याचा आवडता फॉरमॅट आहे. पण मला टी-२० बद्दल फारशी खात्री नव्हती. परंतु आता शुबमन गिलने एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे, की मी माझे शब्द मागे घेतो. आता ही वस्तुस्थिती आहे की आंतरराष्ट्रीय टी-२० मधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.”
हेही वाचा – T20I Tri Series Final: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय महिला खेळाडूंनी धरला ठेका, पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २३४ धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंड संघाचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर गडगडला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.