न्यूझीलंड आणि भारत संघात तिसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना टाय घोषित करण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका १-० या फरकाने जिंकली. ऋषभ पंतचा खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही पंत पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला दोन सामन्यांत केवळ १७ धावा करता आल्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या पंतने आयपीएलमध्येही आपले कौशल्य दाखवले होते. त्यानंतरच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला, मात्र आजतागायत तो टी-२० क्रिकेटमध्ये आपले कर्तृत्व दाखवू शकला नाही.
गेल्या आठ सामन्यांमध्ये पंतला सातत्याने मोठी खेळी खेळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या कालावधीत त्याने आठ डावांत १०४ धावा केल्या आहेत. यावर्षी टी-२० मध्ये पंतच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. त्याचवेळी त्याची दुसरी मोठी खेळी ४४ धावांची आहे. मात्र, हे दोन्ही डाव वेस्ट इंडिजविरुद्धचे आहेत. पंत मोठ्या संघांविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आतापर्यंत तो प्रभाव पाडू शकला नाही.
यंदा ऋषभ पंत सात डावांत दुहेरी आकडा गाठण्यापूर्वीच बाद झाला आहे. ऑफ-स्टंपच्या बाहेरचे चेंडू पंतची कमकुवतता राहिली. त्याचबरोबर तो सातत्याने वाइड लाईनजवळील चेंडूंवर बाद होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंतकडे डावाच्या सलामीची जबाबदारी देण्यात आली होती. पंत पॉवरप्लेमध्ये मोकळेपणाने खेळेल आणि मोठा डाव खेळून आपला फॉर्म परत मिळवेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील एक सामना पावसामुळे वाया गेला. त्याचवेळी उर्वरित दोन सामन्यांमध्ये पंत अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याने १३ चेंडूत ६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात तो ५ चेंडूत ११ धावा करून बाद झाला.
ऋषभ पंतने आतापर्यंत भारतासाठी ६६ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २२.४३ च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही १२६.५४ राहिला आहे. पंतला ५६ डावांमध्ये केवळ तीन अर्धशतके झळकावता आली आहेत. अशा स्थितीत संजू सॅमसनसह अनेक खेळाडूंना संधी मिळत नसल्याने त्याच्या जागी युवा खेळाडूला संधी देण्याची चर्चा आहे.