IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धची सध्याची मायदेशातील कसोटी मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पाहुण्या संघाविरुद्ध दोन सामने खेळून ०-२ ने पिछाडीवर आहे. १२ वर्षांत मायदेशात भारताचा हा पहिलाच कसोटी मालिका पराभव ठरला. उत्कृष्ट परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या ब्लॅककॅप्सने घरच्या भूमीवर भारताच्या वर्चस्वाच्या चर्चा खोडून काढल्या. यजमान संघाच्या पराभवानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशात आता एबी डिव्हिलियर्सने विराट कोहली आणि टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला न्यूझीलंडने कमाल केली आहे. तसेच त्याने भारतीय संघाच्या फिरकीविरुद्ध खेळण्याच्या कौशल्यावरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच न्यूझीलंडचा विजय हा नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या कौशल्याचा परिणाम असल्याचे डिव्हिलियर्सने सांगितले. महान क्रिकेटपटूने आपल्या मताचे समर्थन करण्यासाठी फलंदाज विराट कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर केलेल्या प्रभावी कामगिरीचे उदाहरण देखील दिले.

एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही भारतात जाता तेव्हा असे मानले जाते की भारतीय खेळाडू फिरकीविरुद्धचे सर्वोत्तम खेळाडू आहेत. याचा अर्थ असा होत नाही की सर्वच फलंदाज हे जगात फिरकीविरुद्ध सर्वोत्तम आहेत. जेव्हा तुम्हाला ‘टर्निंग विकेट’ मिळते आणि तुम्हाला एक चांगला गोलंदाज मिळतो, तेव्हा तुम्ही कितीही चांगले फलंदाज असलात तरी तुमच्यावर दबाव असतो. तसेच जर फलंदाजाकडे तंत्र, कौशल्य आणि क्षमता असेल, तर तुम्ही जगातील कोणत्याही खेळपट्टीवर धावा करू शकता.’

हेही वाचा – IND vs NZ : ‘कागज के शेर घर में हुए ढेर…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली

एबी डिव्हिलियर्सने विराटचे दिले उदाहरण –

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांची काहीही चूक नाही. ते सर्व महान खेळाडू आहेत आणि ते चांगल्या प्रकारे फिरकीविरुद्ध खेळू शकतात. परंतु मला वाटते की बऱ्याच संघांना ही धारणा समजली आहे आणि जेव्हा तुम्ही भारतात जाता तेव्हा तुम्हाला ज्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागायचे. आता तो काळ गेला आहे. ९० आणि २००० चे दशक संपले आहे, जेव्हा तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत फक्त एक ‘वॉकिंग विकेट’ होता. आता विराट कोहलीलाच बघा, त्याने दक्षिण आफ्रिकेतही शतके झळकावली आहेत.’