मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने वानखेडेवर रंगलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम केला. त्याने पहिल्या डावात १० विकेट घेत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. एजाजने हा विक्रम रचताच अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. सामना संपल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए)मुंबई क्रिकेट असोसिएशनने एजाज पटेल याचा भारत-न्यूझीलंड स्कोअरशीट आणि मोमेंटो देऊन सत्कार केला.
एजाजनेही आपली स्वाक्षरी केलेली जर्सी आणि चेंडू मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात आठवण म्हणून दिली. याशिवाय भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सर्व भारतीय खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी एजाजला भेट दिली. एजाजपूर्वी १९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा त्याने मोडीत काढला. एजाज हा जन्माने मुंबईकर आहे.
हेही वाचा – IND vs NZ : शेर कभी बूढ़ा नहीं होता..! मुंबईनगरीत अश्विननं रचले विक्रमावर विक्रम; त्रिशतक ठोकलंच सोबतच…
या कामगिरीनंतर एजाज म्हणाला, “ही कामगिरी फक्त मुंबईतच व्हावी, असे माझ्या नशिबात होते. खर सांगायचे तर हे स्वप्नासारखे आहे. माझ्यासाठीच नाही, तर माझ्या कुटुंबासाठीही हा खूप खास प्रसंग आहे.” १९९६मध्ये एजाज मुंबई सोडून न्यूझीलंडला गेला आणि तिथेच स्थायिक झाला.
भारताचा मालिकाविजय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल ३७२ धावांनी नमवले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही. या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.