भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी२० सामन्याला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. न्यूझीलंडची कमान केन विल्यमसनच्या हाती असली तरी भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिक पांड्याला भविष्यातील टी२० कर्णधार बनण्याचा दावा करण्याची ही उत्तम संधी आहे. दुसरीकडे भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि उमरान मलिक या भारतीय संघातील युवा खेळाडूंना यावेळी कामगिरी करून दाखवण्याची संधी असेल.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने जवळपास तोच संघ मैदानात उतरवला आहे जो टी२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळवण्यात आला होता, त्यात ट्रेंट बोल्टला विश्रांती देण्यात आली होती. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी तीन टी२० सामन्यांनंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. टी२० मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या असणार असून काही युवांना संधी देण्यात आली आहे. तसंच संजू सॅमसन, श्रेयस अय्यर सारखे काही खेळाडू संघात पुनरागमन करत आहेत. विराट, रोहित अशा दिग्गजांना विश्रांती देण्यात आली असून त्यामुळेच इनफॉर्म विराटची जागा नक्की कोण घेईल? अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
टी२० विश्वचषक २०२२ मध्ये माजी कर्णधार विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मागच्या जवळपास तीन वर्षांत धावा करण्यासाठी विराट झगडत होता, मात्र काही दिवसांपासून सध्या तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात विराट खेळणार नसल्यामुळे संघासाठी त्याची जागा भरून काढणारा त्याच तोडीचा फलंदाज आवश्यक आहे.
हे आहेत तीन खेळाडू
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याची जागा घेण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडे संजू सॅमसन हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तसंच सॅमसन व्यतिरिक्त श्रेयस अय्यर आणि दीपक हुड्डा यांच्यावरही निवड समितीची नजर असणार आहे. हे तिन्ही खेळाडू विराट कोहलीच्या क्रमांक तीनची पोकळी भरून काढू शकतात. अलीकडेच संजू सॅमसनने न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार फलंदाजी केली. त्या मालिकेत टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो संजू सॅमसन ठरला होता. भारतीय संघात संजू विराटची जागा भरुन काढू शकतो पण सध्या तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अष्टपैलू दीपक हुड्डा आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघेही विराट कोहलीची जागा घेण्याच्या या शर्यतीत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तीन अर्धशतक ठोकली होती. त्यामुळे श्रेयस हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर टी२० विश्वचषकात संघाचा भाग असणारा दीपक हुड्डा हा देखील संघ व्यवस्थापनासाठी एक तगडा पर्याय असू शकतो. दीपक हुड्डा ने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावलं होतं. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन दीपक हुड्डाला देखील विराटच्या जागी संधी देऊ शकतो.