IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रोहित शर्माच्या संघाचा ०-३ फरकाने मालिका गमावली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा दाणादाण उडाली. यावरुन माजी क्रिकेटर अनिल कुंबळे कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरवर संतापले आहेत.

भारताला २००० नंतर प्रथमच मायदेशात व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले. याशिवाय पहिल्यांदाच तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने घरच्या मैदानावरील सर्व सामने गमावले आहेत. तिन्ही कसोटीत भारताला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंची खराब कामगिरी आणि फॉर्म हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अशात अनिल कुंबळे म्हणाले की लोकांनी फलंदाजांना दोष देऊ नये.

अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले –

या मानहानीकारक पराभवावर बोलताना अनिल कुंबळे यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली. भारतीय फलंदाज फॉर्मात नसताना संघ व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजांसाठी अतिशय योग्य असलेली ‘रँक टर्नर’ खेळपट्टी का निवडली, असा सवाल माजी कर्णधाराने केला. ते म्हणाले, “फलंदाजांना दोष देऊ नका. तुम्ही रँक टर्नर खेळता आणि त्यांच्याकडून चौथ्या डावात १५० धावा करण्याची अपेक्षा करता. कर्णधार आणि प्रशिक्षकाला विचारले पाहिजे की तुमचे फलंदाज फॉर्मात नाहीत हे माहीत असताना त्यांनी रँक टर्नर पिच का निवडली?”

हेही वाचा – IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपला. ज्यामुळे भारताकडे २८ धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर संपला आणि त्यांनी एकूण १४६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघ १२१ धावांवरच मर्यादित राहिला. भारताकडून ऋषभ पंतने दुसऱ्या डावात सर्वाधिक ६४ धावा केल्या, तर न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

Story img Loader