India vs New Zealand, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या २१व्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने ऐतिहासिक विजय संपादन केला. या विश्वचषकात टीम इंडियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देतात. नेहमीप्रमाणे या सामन्यानंतरही त्यांनी भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक निवडला. यापूर्वी विराट कोहली, के.एल. राहुल, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांना पदके देण्यात आली होती. दिलीप प्रत्येक सामन्यात नवीन पद्धतीने पुरस्कार देतात. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर स्टेडियमच्या मोठ्या पडद्यावर जडेजाला हा पुरस्कार देण्यात आला. आताही त्यांनी नव्या पद्धतीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला

भारतीय क्रिकेट संघाच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मोहम्मद शमी पत्रकार परिषदेदरम्यान संघाच्या गंमतीजमतीबद्दल बोलताना दिसत आहे. त्याच्या शेजारी मोहम्मद सिराजही उभा राहतो. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या यशाचा आनंद घेत असल्याचे शमीचे यावेळी सांगितले. मग यावेळी शमी सिराजकडे वळून ड्रेसिंग रुममध्ये मिळालेल्या पदकाविषयी चेष्टेने विचारतो की, “आज कोणाला कोणते पदक मिळेल?” हे ऐकून सिराज हसायला लागतो. तो म्हणतो की, “आम्ही पदक समारंभाचा खूप आनंद घेत आहोत. आता ड्रेसिंग रूममध्ये परत गेलो तर खूप मजा येईल.”

दिलीपने अनोख्या पद्धतीने हा पुरस्कार दिला

यानंतर दिलीप संघाला संबोधित करताना म्हणतो, “धरमशाला नेहमीच काही नवीन आव्हाने सादर करते. मात्र, काही प्रसंग वगळता आमचे क्षेत्ररक्षण चांगले झाले आहे. आमचे मैदानी क्षेत्ररक्षण आणि थ्रोइंग उत्कृष्ट आहे. काही झेल सोडल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने सामन्यात परतलो ते कौतुकास्पद होते. तुम्ही सर्वांनी खूप चांगला खेळ केला.” यानंतर दिलीपने सिराजच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. तसेच, श्रेयस अय्यरच्या झेल आणि क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. दिलीपने विराट कोहलीचेही खूप कौतुक केले. दिलीप म्हणतो की, “सर्व खेळाडू मैदानावर खूप मेहनत करत आहेत आणि ते पाहणे खूप आनंददायी आहे.”

खेळाडूंनी खूप आनंद लुटला

यानंतर दिलीप आजचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण याबाबत सस्पेंस निर्माण करतात. ते हातात रिमोट धरलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशा स्थितीत गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही पुरस्कार विजेत्याचा चेहरा मोठ्या पडद्यावर दाखवला जाईल, असे खेळाडूंना वाटते. सर्व खेळाडू उत्साहित होतात. अगदी प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित आणि विराट इतर खेळाडूंबरोबर मजामस्ती करताना दिसत आहेत. यावर दिलीप म्हणतात, “येथे विजेत्याची घोषणा केली जाणार नाही. आपल्या सर्वांना मैदानात जावे लागेल.”

हेही वाचा: IND vs NZ: न्यूझीलंडचा अश्वमेध टीम इंडियाने रोखला! २० वर्षाचा दुष्काळ संपवला, चार गडी राखून केला पराभव, विराट-शमी ठरले विजयाचे शिल्पकार

श्रेयस अय्यरला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

यानंतर सर्व खेळाडू मैदानात येतात आणि मोठ्या पडद्याकडे पाहू लागतात. त्यानंतर स्पायडर कॅमेरा खेळाडूंच्या दिशेने येतो, ज्यावर विजेत्या क्षेत्ररक्षकाचे छायाचित्र लटकलेले असते. त्यात श्रेयस अय्यरचा फोटो टांगलेला असतो आणि मग दिलीप त्याला ते पदक मेडल घालायला लावतात. सहकारी खेळाडूही श्रेयसचे अभिनंदन करतात. श्रेयसही या आनंदातत नाचताना दिसतो. वास्तविक, सामन्यादरम्यान श्रेयसने सिराजच्या चेंडूवर डेव्हन कॉनवेचा अप्रतिम झेल घेतला होता. यानंतर त्याने पदक परिधान करण्याच्या शैलीत आनंदोत्सव साजरा केला. भारत-बांगलादेश सामन्यातही जडेजा असाच सेलिब्रेशन करताना दिसला. याशिवाय श्रेयसने न्यूझीलंडविरुद्ध अनेक चौकारही वाचवले.

हेही वाचा: IND vs NZ: “अतिशय वाईट…” धरमशालाच्या खराब आउटफिल्डवर चाहते संतापले, सोशल मीडियावर केलं प्रचंड ट्रोल

काय घडलं सामन्यामध्ये?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताने २७४ धावांचे लक्ष्य ४८व्या षटकात सहा गडी गमावून पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz award came from the sky shreyas iyer got medal for best fielding watch avw