गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला 157 धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाली. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने 4 बळी घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडलं. त्याला मोहम्मद शमीने 3 बळी घेत तोलामोलाची साथ दिली. या खेळीदरम्यान कुलदीप यादवने दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत.

अवश्य वाचा – IND vs NZ : नेपियरच्या मैदानात शमीच्या बळींचं शतक, केली अनोख्या विक्रमाची नोंद

न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कुलदीप तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीमध्ये भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे 5/33 या कामगिरीसह पहिल्या तर जवागल श्रीनाथ 4/23 या कामगिरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. कुलदीपने आजच्या सामन्यात 39 धावांमध्ये 4 फलंदाजांना माघारी धाडलं.

याचसोबत न्यूझीलंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या डावखुऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजांच्या यादीत कुलदीपने दुसरं स्थान मिळवलं आहे. नेदरलँडचा मायकल रिपॉन या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने कॅनडाविरुद्ध 37 धावात 4 बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडमध्येही आपली चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारताचा न्यूझीलंड दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

Story img Loader