ICC चँपियन्स ट्रॉफी २०२५ ची महाअंतिम फेरी आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलँड या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम आज एकमेकांचा सामना करणार आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅचमध्येच भारताकडून पराभव पत्कारावा लागला आहे. सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत २५ वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ऑक्टोबर २००० ला काय घडलं होतं?

१५ ऑक्टोबर २००० या दिवशी भारत आणि न्यूझीलंड हे दोन देश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नैरोबी या ठिकाणी हा सामना पार पडला होता. सौरभ गांगुली तेव्हा टीम इंडियाचा कप्तान होता. त्या सामन्यात सौरभ गांगुलीने ११९ धावा केल्या तर सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. भारताने न्यूझीलंडविरोधात २६४ धावा करत त्यांना २६५ धावांचं लक्ष्य दिलं होतं.

न्यूझीलंडची बॅटिंग सुरु झाली आणि पाच विकेट गेल्या

नैरोबीला झालेल्या या सामन्यात गोलंदाजांनीही कमाल केली होती. क्रेग स्पिअरमनला २ धावांवर तर त्यावेळी कॅप्टन असलेल्या स्टीफन फ्लेमिंगला ५ धावांवार व्यंकटेश प्रसादने आऊट केलं. स्कोअर बोर्डवर १३२ धावा झळकेपर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. मात्र ऑलराऊंडर ख्रिस केयन्स आणि क्रिस हॅरीस यांनी १४८ धावांची पार्टनरशिप करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. हॅरीसने नाबाद १०२ धावांची खेळी केली तर केयन्सने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडने आयसीसीटीची स्पर्धा जिंकून चॅम्पियन होण्याची ती पहिलीच वेळ होती. भारताने सामना गमावाला होता. याच सामन्याची आठवण आज अनेकांना झाली आहे.

२०१९ मध्ये काय घडलं?

टीम इंडियाच्या मनात पराभवाची ही सल राहिलेली आहेच. दरम्यान २०१९ मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटटीमचा पुन्हा स्वप्न भंग केला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ ८ गडी गमावून २३९ धावाच करु शकला होता. भारताला विजयासाठी २४० धावा करायच्या होत्या हे लक्ष्य भारत सहज गाठेल असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. त्या सामन्यात भारताचा स्कोअर ७१ होईपर्यंत पाच विकेट गेल्या होत्या. रवींद्र जडेजाने ७७ धावा करत आणि शेवटी एम. एस धोनीने ५० धावा करत खिंड लढवली होती. पण धोनीला मार्टिन गुप्टिलने रन आऊट केलं होतं आणि त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केलं. ज्यानंतर भारताचं विश्वेविजेता संघ बनण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता या दोन्ही पराभवांचा वचपा टीम इंडिया आज काढेल अशी चर्चा रंगली आहे. मात्र खेळ म्हटलं की त्यात काहीही होऊ शकतं. क्रिकेट हा तर सर्वात अनिश्चततेचा खेळ आहे. त्यामुळे आज काय होणार याकडे सगळ्याच क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे यात शंका नाही.