Champions Trophy Final: बुधवारी ५ मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं विक्रमी धावसंख्या उभारून द. आफ्रिकेला सहज नमवलं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आता भारत व न्यूझीलंड आमनेसामने येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. टीम इंडियानं याआधी साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी पहिली पसंती असेल असं मानलं जात आहे. पण असं असलं, तरी फायनलमध्ये भारतासमोर येताना न्यूझीलंडचा संघ आधीच्या पराभवातले धडे आणि दुबईत खेळण्याचा आधीचा अनुभव गाठीशी बांधून पूर्ण तयारीनिशी सज्ज असेल. त्यामुळे काही गोष्टींवर टीम इंडियाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे.
१. दुबईतील स्थितीचा परिचय…
दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दुबईत खेळलेला नव्हता. पण न्यूझीलंड साखळी सामन्यात भारताशीच खेळल्यामुळे त्यांच्यासाठी इथली परिस्थिती परिचयाची असेल. याशिवाय या संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ अत्यंत समतोल आणि तुल्यबळ राहिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या काही जमेच्या बाजू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. साखळी सामन्यात त्याची चुणूक भारतीय संघानं अनुभवली असल्याने टीम इंडियाही त्यासाठी सज्ज असेल.
२. न्यूझीलंडची फिरकी…
संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या जादुई फिरकीशी कुणाची बरोबरी होऊ शकत असेल तर तो न्यूझीलंडचा संघ आहे. संघाचा कर्णधार मिचेल सँटरन हा स्वत: उत्तम फिरकीपटू असून त्याच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडकडे मिचेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्र हे तीन दर्जेदार फिरकीपटू आहेत. साखळी सामन्यात भारतानं त्यांना मात दिली. पण अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा संघ पूर्ण अभ्यास करूनच उतरेल. भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना झाला त्याच खेळपट्टीवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे फिरकीपटूंसाठी या खेळपट्टीकडून चांगली मदत मिळू शकते. अर्थातच जशी ती भारतीय फिरकीपटूंना मिळेल, तशीच ती न्यूझीलंडच्याही फिरकीपटूंना मिळेल.
३. नवा चेंडू आणि जलदगती गोलंदाज…
न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांना नवा चेंडू हवेत वळवण्यात मिळणारं यश भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं. भारतानं दुबईत खेळलेल्या इतर तीन सामन्यांमध्ये जलदगती गोलंदाजांसाठी चेंडूची अशी हालचाल साध्य होऊ शकलेली नाही. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दुबईत हे साध्य करून दाखवलं आहे. गोलंदाजांची उंची ही न्यूझीलंडच्या जलदगती माऱ्याची जमेची बाजू आहे. त्याशिवाय यामुळे त्यांना अधिकचा बाऊन्सही मिळू शकतो. त्यामुळे भारताला पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या या जलदगती माऱ्याचं उत्तर हाती ठेवूनच फलंदाजीसाठी उतरावं लागेल.
४. चपळ क्षेत्ररक्षण…
भारताविरूद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सनं विराट कोहलीचा घेतलेला अविश्वसनीय झेल अजूनही भारतीय क्रिकेट चाहते विसरू शकलेले नाहीत. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सरासरी ३० ते ४० धावा वाचवल्या आहेत. फिलिप्सव्यतिरिक्त स्वत: कर्णधार सँटनर, विल यंग, मिचेल ब्रेसवेल असे तगडे क्षेत्ररक्षक न्यूझीलंडसाठी धावाही वाचवतात आणि अप्रतिम झेलही टिपतात. त्यामुळे प्रत्येक धावेसाठी टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगले फटके मारावे लागतील.
५. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी…
टीम इंडियाप्रमाणेच किवींकडेही सातव्या-आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. रचिन रविंद्र, केन विल्यम्सन, विल यंग फलंदाजीच्या क्रमात सर्वात वर आहेत. मधल्या षटकांत भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी टॉम लेथम, डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स हे मधल्या फळीतील फलंदाज आहेत. शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यासाठीही किवींकडे फलंदाज आहेत.
साखळी सामन्यात पहिल्यांदाच दुबईच्या परिस्थितीत भारतीय फिरकीचा सामना करणारा न्यूझीलंडचा संघ यंदा अंतिम सामन्यात खेळण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरेल. त्यामुळे टीम इंडियालाही यावेळी अधिक सतर्क राहून अंतिम सामन्यातील विजय निश्चित करावा लागेल.