IND vs NZ Gautam Gambhir Says Virat Kohli is hungry for runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. कारण १६ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात बांगलादेशविरुद्ध मोठी खेळी खेळू न शकलेल्या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा आहेत. त्यामुळे न्यूझीलंड मालिकेपूर्वी संघाचा कोच गौतम गंभीर विराट कोहलीची ढाल बनला आहे. गौतम गंभीरने विराट कोहलीबद्दल प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील कामगिरीबबद्दलही भाकीत केले आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला?

भारतीय संघाचा मुख्य कोच गौतम गंभीर कोहलीबद्दल म्हणाला, ‘पहा, विराटबद्दल माझे मत नेहमीच स्पष्ट राहिले आहे. तो एक जागतिक दर्जाचा क्रिकेटर आहे. त्याने दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे. पदार्पणाच्या वेळी त्याला जितकी धावांची भूक होती. तितकीच धावांची भूक अजून कायम आहे. मला खात्री आहे की तो या मालिकेत धावा करण्यासाठी भुकेला असेल आणि बहुधा तो ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी करेल.त्यामुळे कोणत्याही खेळाडूचे एका खराब मॅच किंवा मालिकेच्या आधारावर मूल्यमापन करता कामा नये. तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूबद्दल मत मांडू शकत नाही.’

प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूबद्दल मत मांडणे चुकीचे –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘जर तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूबद्दल मत मांडत असाल, तर ते त्याच्यासाठी योग्य नाही. कारण प्रत्येकाचा दररोज सर्वोत्तम दिवस असतो असे नाही. मला वाटते की आमच्याकडे ज्या प्रकारचे वातावरण आहे, आम्ही आमच्या खेळाडूंना पाठिंबा देत राहू. माझे काम सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंची निवड करणे आहे, मला खात्री आहे की प्रत्येकजण दमदार प्रदर्शन करण्यासाठी भुकेलेला आहे. कारण त्यांना माहित आहे की सलग आठ कसोटी सामने खेळायचे आहेत.’

हेही वाचा – PAK vs ENG : ‘तो पाकिस्तान क्रिकेटचा…’, बाबर-शाहीन आणि नसीम यांना संघातून डच्चू देण्यावर बेन स्टोक्स काय म्हणाला? पाहा VIDEO

टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची –

या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना पुण्यात होणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ज्याचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. वास्तविक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघाला आपले स्थान कायम राखायचे आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्त्वाची आहे.

हेही वाचा – IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.