अखेरच्या टी-20 सामन्यात अटीतटीच्या लढतीमध्ये न्यूझीलंडने भारतावर मात करुन 3 सामन्यांची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. या पराभवासह भारताचं न्यूझीलंडमधलं टी-20 मालिका जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरचं राहिलं. तिन्ही सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेषकरुन बंदीची शिक्षा भोगून संघात पुनरागमन केलेला हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल हे या मालिकेतले सर्वात महागडे गोलंदाज ठरले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मिळवून हार्दिक आणि कृणालने न्यूझीलंडच्या फलंदाजांना खोऱ्याने धावा दिल्या आहेत.

हार्दिकने 3 सामन्यात 131 धावा देत सर्वात जास्त धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिलं, तर कृणालने 119 धावा देत तिसरं स्थान पटकावलं आहे. गोलंदाजीसोबत या मालिकेत भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगलीच निराशा केली. तिन्ही सामन्यांमध्ये भारताच्या कसलेल्या क्षेत्ररक्षकांनी काही सोपे झेल सोडले. याचसोबत क्षेत्ररक्षणादरम्यान अनेक धावा बहाल केल्यामुळे न्यूझीलंडचा संघ सामन्यात मोठी मजल मारु शकला. या मालिकेनंतर भारतासमोर आता ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. 24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

Story img Loader