न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मालिका जिंकली आहे. कर्णधार म्हणून त्याचा विजयी विक्रम आतापर्यंत १०० टक्के राहिला आहे. मात्र, तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पावसाने रद्द करण्यात आला होता, तर तिसरा सामन्यात पावसाने पुन्हा व्यत्यय आणला त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला. याचबरोबर टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची मालिका १-० अशी खिशात घातली.
सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी गेला त्यावेळी त्याला संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तसेच या दोघांना न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर चाहत्यांसह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर संघ निवडी संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यासर्व प्रश्नांवर हार्दिक पांड्या थोडा चिडला पण त्याने यावर सविस्तर उत्तर दिले.
हार्दिक पांड्याने यावर उत्तर दिले
हार्दिक पांड्या यावर उत्तर देताना म्हणाला की, “ हा माझा संघ आहे, संघाचे प्रशिक्षक आणि माझे सहकारी खेळाडू यांना जे ठीक वाटेल तसेच मी करतो. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी पुढे पाऊल टाकत नाही.” पुढे तो बोलताना म्हणाला की, “पहिली गोष्ट म्हणजे बाहेर कोण काय म्हणतंय याने आमच्या पातळीवर काही फरक पडत नाही. माझ्या संघाबाबतचे सर्व निर्णय हे आम्ही सर्वजण मिळून ठरवतो. त्यावेळी गरजेनुसार आम्हाला हवा तो संघ घेऊन आम्ही मैदानात उतरतो. त्या दोघांनाही संघात खेळण्याची संधी मिळेल पण त्याला खूप वेळ आहे कारण पुढची टी२० मालिकेला अजून खूप अवकाश आहे. प्रत्येकाला संधी मिळेल जर मोठी मालिका असती, अधिक सामने झाले असते, तर अधिक संधी मिळाल्या असत्या, पण ही छोटी मालिका होती.” भारतीय कर्णधार पुढे म्हणाला की, “मी जास्त बदलांवर विश्वास ठेवत नाही आणि पुढेही करणार नाही. वास्तविक, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या बोलत होता.”
मला गोलंदाजीचे सहा पर्याय हवे होते
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, “मला जसे गोलंदाजीचे सहा पर्याय हवे होते आणि दीपक हुडाने गोलंदाजी केली तशीच ती गोष्ट या दौऱ्यात आली आहे. तो म्हणाला की, अशा फलंदाजांनी जरा कमी गोलंदाजी केली तर तुम्हाला अनेक संधी मिळतील. तसेच, गोलंदाजीचे पर्याय अधिक असतील तर विरोधी फलंदाजांसमोर अधिक पर्याय असतील”, असेही तो म्हणाला.