सूर्यकुमार यादवने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार खेळी खेळली ज्यामुळे तो जगातील पहिल्या क्रमांकाचा टी२० फलंदाज का आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्याने ५१ चेंडूत नाबाद १११ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि सात षटकार ठोकत कमाल केली. रविवारी बे ओव्हल येथे न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ६ बाद १९१ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने तब्बल ६५ धावांनी जिंकला. या खेळीनंतर, ब्रॉडकास्टर्सला सूर्यकुमार मिडइनिंगची मुलाखत देत होता. त्यांच्या मध्येच येत ऋषभ पंतने सूर्यकुमारची केवळ चार शब्दांत स्तुती केली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. यामध्ये भारताने आपले ३ गडी फार लवकर गमावले. पंततर १५ चेंडूत अवघ्या सहाचं धावा करू शकला. मात्र सूर्यकुमार ज्या प्रकारे खेळत होता ते बघून तो जणू वेगळ्याच खेळपट्टीवर फलंदाजी करत आहे असे जाणवले. त्याने फिरकीपटूंविरुद्ध स्वीप शॉट्स खेळले, लोफ्टेड ड्राईव्ह खेळले, अतिरिक्त कव्हरवर इनसाईड-आउट शॉट्स आणि फाइन-लेगवर रॅम्प शॉट देखील खेळले. त्याने मैदानात अशी एकही जागा सोडली नाही जिथे त्याने फटके मारले नाही.
पहिल्या इंनिंग नंतर सूर्यकुमारला त्याच्या खेळीबद्दल बोलण्यासाठी ब्रॉडकास्टर्स, प्राइम व्हिडिओने आमंत्रित केले होते जिथे तो म्हणाला की, “टी२० मध्ये शतक ठोकणे हे नेहमीच खास असते परंतु त्याच वेळी खेळपट्टीवर शेवटपर्यंत फलंदाजी करणे महत्वाचे होते. कर्णधार हार्दिक मला १८व्या किंवा १९व्या षटकापर्यंत फलंदाजी करून १८५ किंवा त्याहून अधिक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी सांगत होता. १६ वे षटक संपल्यानंतर आम्ही ते अजून पुढे घेऊन जाण्याचे ठरवले. शेवटच्या काही षटकात जास्तीत जास्त धावा करणे महत्त्वाचे होते. नेटमध्ये याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत असल्याकारणाने ते माझ्यासाठी या सामन्यात लाभदायी ठरले.”
याच चर्चेदरम्यान, अचानक ऋषभ पंत मागून आला आणि त्याने सूर्यकुमारला मिठी मारली आणि मुलाखत संपल्यानंतर त्याने या खेळीचे वर्णन केवळ ४ शब्दात केली. तो म्हणाला की, “ही अविश्वसनीय खेळी आहे”. सूर्यकुमारच्या खेळीमुळे भारताला दुसऱ्या टी२० सामन्यात १९२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात यश आले.