IND vs NZ 2nd Test Highlights: बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतला विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. विकेटकिपिंग करत असताना रवींद्र जडेजाचा चेंडू थेट पंतच्या उजव्या गुडघ्याला लागला, अपघातानंतर त्याच्या याच पायावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि खेळाच्या तिसऱ्या दिवशीही तो विकेटकिपिंगसाठी मैदानात आला नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेट्सच्या मागे होता.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की, त्याच्या गुडघ्याला सूज आली होती त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. हिटमॅनच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाला पंतबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही, पण आता प्रश्न असा आहे की जर पंत फलंदाजीसाठी मैदानावर आला नाही तर दुसऱ्या डावात त्याच्या जागी कोण फलंदाजी करेल.

हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी

ऋषभ पंतला दुखापत झाल्यानंतर ध्रुव जुरेल त्याच्या जागी विकेटकिपिंगसाठी मैदानात आला, पण जर तो फलंदाजीला आला नाही तर त्याच्या जागी जुरेल फलंदाजी करू शकणार नाही. म्हणजेच पंत क्रीजवर न आल्यास टीम इंडियाला दुसऱ्या डावात १० फलंदाजांसह खेळावे लागेल. न्यूझीलंड संघाने उभारलेल्या ३५६ धावांची आघाडी पाहता टीम इंडियासाठी ही मोठी बाब असणार आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक्सवर पोस्ट करत पंतच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले. ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकिपिंगसाठी उतरेल असे सांगितले. तर बीसीसीआयची टीमच्या देखरेखीखाली पंत असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

आयसीसीच्या नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असेल किंवा त्याला करोनाची लागण झाली असेल तरच प्लेइंग इलेव्हनमधील दुसरा खेळाडू बदलू शकतो. पंतला मोठी दुखापत झाली नसल्याने त्याच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूला फलंदाजी करता येणार नाही.

पंतने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक २० धावांची खेळी खेळली. पहिल्या डावात भारतीय संघ ४६ धावांवर बाद झाला, तर पहिल्या डावात न्यूझीलंड संघाने रचिन रवींद्रच्या १३४ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ४०२ धावा केल्या. दुसऱ्या डावात किवी संघाला भारतावर ३५६ धावांची आघाडी मिळाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल जोडीने टी ब्रेकपर्यंत ५६ धावा केल्या आहेत.