IND vs NZ India have won the toss against New Zealand and decided to bat first : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शुबमन गिल आणि आकाश दीपच्या जागी सर्फराझ खान आणि कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात एकूण ९८ षटके टाकली जातील.
बुधवारी सकाळी बंगळुरूमधील पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाने व्यत्यय आणला आणि त्यानंतर दिवसभर पाऊस पडत राहिला, त्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता हवामान स्वच्छ होते आणि ग्राउंड स्टाफने सकाळी ८ वाजेपर्यंत मैदान खेळण्यायोग्य केले. मात्र, आजही पावसाची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड कसोटी रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, ६२ सामन्यांपैकी भारताने २२ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने १३ सामने जिंकले आहेत. २७ सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला आहे.
शुबमनच्या जागी सर्फराझला संधी –
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून शुबमन गिलला वगळण्याचे कारण त्याच्या कामगिरीशी संबंधित नसून दुखापतीच्या समस्येमुळे आहे. शुबमन गिलला मानदुखीचा तक्रार त्रास होत असल्याने विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी सर्फराझ खानला संधी देण्यात आली आहे. सर्फराझ खानने नुकतेच इराणी चषक स्पर्धेत द्विशतक झळकावले होता. आता बंगळुरू कसोटीतही सर्फराझकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
हेही वाचा – रायफल थ्री पोझिशन प्रकारात अखिलला कांस्य
आकाशदीपच्या जागी कुलदीपला संधी मिळाली –
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शुबमन गिलऐवजी फक्त सरफराज खानला खेळवण्याचा निर्णय घेतला नाही. त्याबरोबर आणखी एक बदल करण्यात आला आहे. आकाशदीपच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आला आहे. आकाशदीपच्या जागी कुलदीप संधी देण्याचे कारण दुखापत नसून बंगळुरूची स्थिती आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्के.