IND vs NZ India registered embarrassing record after 19 years : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ३६ वर्षांनी मायदेशात पराभवाचा सामना करावा लागला. त्याबरोबर पाहुण्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या पराभवानंतर भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला. यापूर्वी १९ वर्षांपूर्वी भारतीय संघाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला होता.

भारतीय संघाच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला –

पहिल्या डावात ४६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४६२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र, असे असतानाही टीम इंडियाला सामन्याच्या पाचव्या दिवशी पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्याच देशात ४६२ धावांची मोठी धावसंख्या उभारूनही भारतीय संघाचा पराभव झाला. इतकी मोठी धावसंख्या उभारुनही भारत पहिल्यांदाच पराभूत झाला आहे. यापूर्वी २००५ मध्ये असे घडले होते, जेव्हा भारताने बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध ४४९ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती आणि पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता १९ वर्षांनंतर मोठी उलथापालथ झाली आहे.

भारताचा घरच्या मैदानावरील पराभवातील सर्वोच्च धावसंख्या :

४६२ विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, २०२४
४४९ विरुद्ध पाकिस्तान, बंगळुरू, २००५
४३६ विरुद्ध इंग्लंड, हैदराबाद, २०२४
४२४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, १९९८
४१२ विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, १९८५

हेही वाचा – टॉम लॅथमही करणार होता रोहितने केलेली चूक, मात्र नशिबाने तारलं, विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार काय म्हणाला?

न्यूझीलंडने ८ गडी राखून जिंकला सामना –

भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ४६ धावांवर गारद झाला होता. या डावात ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक २० धावा केल्या होत्या. पहिल्या डावात न्यूझीलंडने ४०२ धावांची मोठी मजल मारली. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने १५७ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले आणि सर्फराझ खानच्या १५० आणि ऋषभ पंतच्या ९९ धावांच्या जोरावर ४६२ धावा केल्या. यानंतर १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने ८ विकेट्सनी सामना जिंकला.