IND vs NZ India set New Zealand a target of 107 runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातील आता ५ व्या दिवसाचा खेळ शिल्लक असून न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात पहिल्या सामन्यात भारतीय संघ ४६ धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या होत्या. यानंतर भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. त्यामुळे आता भारत १०७ धावांचा बचाव करु शकेल का? भारताने कसोटीत इतिहासात एवढ्या कमी धावसंख्येचा किती वेळा बचाव केला आहे? जाणून घेऊया.

भारतीय संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. पण पहिल्या डावात ४६ धावांत सर्वबाद झाल्यामुळे दुसऱ्या डावात ४५० पेक्षा जास्त धावसंख्याही अपुरी पडली. भारतासाठी सर्फराझ खानने सर्वाधिक १५० धावांची खेळी साकारली, तर ऋषभ पंत त्याच्या सातव्या कसोटी शतकापासून १ धावा दूर राहिला. ९९ धावा करून पंत विल्यम ओरूर्कचा बळी ठरला. पंतने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकार मारले.

न्यूझीलंडला मिळाले १०७ धावांचे लक्ष्य –

एकेकाळी पंत आणि सरफराज यांनी क्रीझवर पाय रोवले होते. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये १५० हून अधिक धावांची भागीदारी झाली, परंतु त्यानंतर न्यूझीलंडने भारतीय डावाच्या ८० व्या षटकानंतर नवीन चेंडू घेतला, त्यानंतर संघाने १५.२ षटकात सात गडी बाद केले. या सर्व विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. पंत-सर्फराझमध्ये चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी झाली. पंत बाद झाल्यानंतर एकही भारतीय फलंदाज क्रीझवर जास्त काळ टिकू शकला नाही. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ ४६२ धावांवर आटोपला. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य मिळाले.

हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझने पहिल्याच शतकासह घडवला इतिहास, १९९६ नंतर ‘हा’ खास विक्रम नोंदवणारा ठरला पहिलाच भारतीय

भारताला वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी –

वास्तविक, खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवशीचा खेळ नियोजित वेळेच्या थोडे आधी संपला. न्यूझीलंडची सलामीची जोडी केवळ ४ चेंडू खेळू शकली आणि त्यानंतर सामना थांबवण्यात आला. आता पाचव्या दिवशी न्यूझीलंड १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात करेल. एवढ्या कमी लक्ष्याचा बचाव करणे भारतीय संघासाठी अवघड असले तरी ते अशक्य नाही. भारतीय संघाने १०७ धावांचे लक्ष्य आधीच पेलले आहे. २० वर्षांपूर्वी टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध १०७ धावांचा बचाव केला होता. आता टीम इंडियाला २० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…सूरज अपने ही समय पर निकलेगा’, सर्फराझच्या वडिलांचे शब्द ठरले खरे, डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टने जिंकली मनं

कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करणारे संघ –

८५- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल (१८८२)
९९- वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, पोर्ट ऑफ स्पेन (२०२२)
१०७- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वानखेडे (२००४)
१११- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी (१८८७)
१११- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, ओव्हल (१८९६)