India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडवर चार गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. या आवृत्तीचा हा २१वा सामना होता. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्याचे ४९वे शतक हुकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने न्यूझीलंडचा पराभव केला

भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये किवी संघाचा विजय रथ भारताने रोखला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया अजूनही या स्पर्धेत अजिंक्य आहे. या विजयासह भारतीय संघाचे १० गुण झाले असून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडला पहिला पराभव पत्करावा लागला असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयासह टीम इंडियाने २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा देखील बदला घेतला.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

खराब सुरुवातीनंतर कुलदीपचे पुनरागमन

या सामन्यात रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी सुरुवातीपासूनच कुलदीप यादववर दडपण आणले होते. किवी फलंदाजांनी आपल्या पहिल्याच षटकात खूप धावा केल्या होत्या. या कारणास्तव कुलदीपने पहिल्या पाच षटकात एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र, नंतर त्याने त्यांच्यावरचं दबाव निर्माण केला आणि दोन विकेट्सही घेतल्या. याशिवाय त्याने इतर गोलंदाजांना चांगले सहकार्य केले. त्याच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने २५ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IND vs NZ: “अतिशय वाईट…” धरमशालाच्या खराब आउटफिल्डवर चाहते संतापले, सोशल मीडियावर केलं प्रचंड ट्रोल

मोहम्मद शमीची शानदार कामगिरी

या विश्वचषकात मोहम्मद शमीला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर क्रिझवर स्थिरावलेल्या रचिन रवींद्रला बाद करत १५९ धावांची भागीदारी तोडली. शेवटी त्याने तीन विकेट्स घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने १० षटकात ५४ धावा देत पाच विकेट्सही घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना मदत केली. भारतीय संघाचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz india reached the top of the points table after defeating new zealand by four wickets kohli missed a century avw