IND vs NZ Pune Test Pitch Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी पुण्याच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आधीच ०-१ ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पावसाचा मोठा फटका बसला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले होते आणि पहिल्या डावात संघ ४६ धावांत गारद झाला होता. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता दुसऱ्या कसोटीत पुण्याची खेळपट्टी कशी असेल? जाणून घेऊया.
पुणे पिच रिपोर्ट –
ईएसपीएनक्रिकइंफोच्या वृत्तानुसार, पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंसाठी अनुकूल खेळपट्टी बनवली जाऊ शकते. अहवालानुसार, प्रामुख्याने काळ्या मातीचा समावेश असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूमधील पहिल्या कसोटीपेक्षा कमी उसळी असेल. ही खेळपट्टी सपाट आणि संथ असेल. या कारणास्तव, तिथे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश करू शकते. फिरकीपटू पुण्याच्या खेळपट्टीवर कहर करू शकतात आणि फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतात.
पुण्याच्या मैदानावर भारताचा कसा आहे रेकॉर्ड?
भारताने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत एकूण दोन कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी एक जिंकला आणि एक गमावला आहे. भारतीय संघाने २०१७ मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, भारताने २०१९ मध्ये येथे दुसरा कसोटी सामना खेळला, जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि १३७ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात तत्कालीने भारताचा कर्णधार विराट कोहलीने २५४ धावांची स्फोटक खेळी साकारली होती.
हेही वाचा – Neymar : नेयमारचं यशस्वी पुनरागमन; अल हिलालचा अल ऐनवर विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.