IND vs NZ 1st Test Updates Team India 1st Inning : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदांजी त्रिकुटाने पूर्णपणे चुकीचा असल्याचा सिद्ध केला. कारण या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणापुढे सपशेल शरणागती पत्करली, ज्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर गारद झाला. यासह भारताने लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे या डावात भारताच्या अर्ध्या संघाला भोपळाही फोडता आला नाही.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीही घडले नाही, जे आज म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बंगळुरू येथे घडले. विशेषतः जर आपण भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे म्हणले तर भारताने पहिला कसोटी सामना १९३३ मध्ये खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक खेळाडू आले आणि गेले. या दरम्यान अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले, पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जो दुर्दैवी दिवस पाहिला गेला तो यापूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता. कर्णधार खेळपट्टी वाचण्यात अपयशी ठरला का? हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे, कारण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रोहितने घेतला होता. दरम्यान, भारतीय भूमीवर यापूर्वी कधीही न घडलेले असे काय घडले ते जाणून घेऊया.

टीम इंडियाची फलंदाजी न्यूझीलंडसमोर हतबल ठरली –

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आज न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून कोणतेही कारण नसताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो पूर्णपणे चुकीचा ठरला. मात्र या निर्णयाचा पहिला बळी स्वत: कर्णधार ठरला. सातवे षटक सुरू असताना रोहित शर्मा केवळ २ धावा काढून बाद झाला. यानंतर एकामागून एक सात विकेट्स गमावल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या ७ फलंदाजांपैकी ४ फलंदाज असे होते, ज्यांना आपले खातेही उघडता आले नाही. यापेक्षा लाजिरवाणा दिवस कोणता असू शकतो? भारतीय भूमीवर असे प्रथमच घडले आहे. याआधी हा दिवस परदेशात दिसला असला तरी, भारतात पहिल्यांदाच पाहिला मिळाला आहे.

हेही वाचा – IPL 2025 पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का! ‘या’ कोचने आगामी हंगामातून घेतली माघार

भारतात पहिल्यांदाच टीम इंडियाचे टॉप ७ पैकी चार फलंदाज शून्यावर बाद –

भारतीय संघासोबत १९५२ साली पहिल्यांदाच असा प्रसंग घडला झाला होता. अपघात हा शब्द ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण क्रिकेटच्या खेळात याला अपघातापेक्षा कमी म्हणता येणार नाही. १९५२ मध्ये हेडिंग्ले येथे भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध शून्यावर आपले टॉप ७ फलंदाज गमावले होते. हा सामन्याचा तिसरा डाव होता. त्यानंतर २०१४ मध्ये हा दिवस पुन्हा आला. त्या वर्षी हा सामना इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे खेळला जात होता. ज्यामध्ये भारतीय संघातील टॉप ७ मधील ४ फलंदाज शून्यावर बाद झाले होते.

हेही वाचा – IND vs NZ : भारताची उडाली दाणादाण; न्यूझीलंडच्या वेगवान त्रिकुटासमोर शरणागती

भारताच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही –

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरु येथील पहिल्या कसोटी सामन्यात किवीच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची भंबेरी उडावली. कारण या सामन्यात भारताच्या पाच फलंदाजांना धावांचे खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे यामध्ये या यादीत स्टार खेळाडूंचा समावेश दिसून आला. या यादीत सर्वात मोठे नाव विराट कोहलीचे आहे. रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली नवख्या विल्यम ओ रुकने शून्यावर झेलबाद केले. विराटबरोबर या यादीत सर्फराझ खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला. न्यूझीलंडसाठी मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर विल्यमने चार आणि साऊदीने एक विकेट घेतली.