IND vs NZ Ahmed Shahzad made fun of India after Pune test : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ६९ वर्षांत पहिल्यांदा कसोटी मालिका गमवावी लागली. ज्यामुळे रोहित शर्माच्या संघाला माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुणे कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरच्या फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करली. आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताच्या पराभवाची खिल्ली उडवली आहे. त्याने भारताच्या खेळाडूंना ‘कागज के शेर’ असे संबोधले आहे. भारतीय संघ आता एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात क्लीन स्वीपपासून वाचण्याचा प्रयत्न करेल.

भारताने गेल्या १२ वर्षात घरच्या मैदानावर एकूण १८ मालिका जिंकल्या आहेत. मात्र, सलग १९वी मालिका जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. कारण शनिवारी शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारता ११३ धावांनी दारुण पराभव केला. यासह ६९ वर्षांत पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्त्युत्तरात भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला.

पाकिस्तानचा माजी खेळाडू अहमद शहजाद काय म्हणाला?

यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू अहमद शहजादने आपल्या यूट्यूब चॅनेलवर भारतीय संघाची खिल्ली उडवली. अहमद शहजाद म्हणाला, न्यूझीलंडने भारतात जाऊन यजमानांना धूळ चारली, जणू त्यांचा तो अधिकारच आहे. त्यांनी भारतीय संघाचा लहान मुलांप्रमाणे दारुण पराभव केला. एक प्रकारे किवी संघाने भारताची खिल्ली उडवल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे आता लोक म्हणू लागले आहेत की, ‘कागज के शेर घर में हुए ढेर.’

हेही वाचा – ‘मला किंग नव्हे तर कर्णधार व्हायचंय…’, पाकिस्तान संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती होताच मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य

शहजादने रोहित शर्मावर साधला निशाणा –

अहमद शहजाद पुढे म्हणाला की, बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ ४६ धावांत गडगडला, तेव्हा रोहित शर्मा म्हणाला होता की, प्रत्येकाचा खराब दिवस येतो आणि आम्ही हे मान्य करतो. हे अगदी ठीक आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने पुणे कसोटी सामन्यात क्रिकेट खेळलात, त्यावरून तुम्ही आत्मसंतुष्ट झाला आहात असे वाटले. भारतीय कर्णधार म्हणत राहतो की तो फालतू बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, पण गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ती भावना गायब होती.

हेही वाचा – राधा यादवच्या शानदार क्षेत्ररक्षणाने फेडले चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे, चित्ताकर्षक कॅचचा VIDEO व्हायरल

न्यूझीलंडने ६९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली –

भारताला घरच्या मैदानावर पराभूत करून न्यूझीलंडने ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली आहे. याआधी न्यूझीलंड संघाने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नव्हती. किवी संघ १९५५ पासून भारत दौऱ्यावर येत राहिला आहे. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया जोरदार पुनरागमन करेल, असे रोहितचे म्हणणे आहे. चिंतेची बाब म्हणजे यावेळी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीची बॅट तळपताना दिसत नाही.