भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात श्रेयसने शानदार शतक झळकावले. त्याने १०५ धावांची खेळी खेळली, ज्यात दोन षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीने कानपूरच्या लोकांना वेड लावले. लोकांनी स्टँडवर ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणा दिल्या.
चाहत्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा अय्यर हा १६वा भारतीय फलंदाज आहे. इतकेच नव्हे, तर कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा तो सलग तिसरा मुंबईकर ठरला.
हेही वाचा – IPL 2022 : राजस्थान रॉयल्सनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; १४ कोटी देऊन ‘या’ खेळाडूला ठेवलं संघात!
यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे. भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्माने २०१३मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक ठोकले. यावेळी त्याने १७७ धावांची खेळी केली. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये १३४ धावांची खेळी केली. आता श्रेयसने आपला क्रमांक फलकावर लावला आहे.
भारताचा पहिला डाव
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला आहे. श्रेयसच्या शतकी खेळीव्यतिरिक्त सलामीवीर शुबमन गिलने ५२ धावांचे योगदान दिले. वरची फळी गारद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली. जडेजाने ५० धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार ठोकले. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने अर्धा संघ गारद केला.