भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे मुंबई कसोटी उशिरा सुरू झाली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात केली, पण पहिल्या सत्राच्या अखेरीस न्यूझीलंडच्या संघाने वरचढ ठरला. फिरकीपटू एजाज पटेलने चहापानाच्या विश्रांतीपूर्वी एकापाठोपाठ तीन बळी घेतले. गिल ४४ धावा काढून बाद झाला. काही वेळाने चेतेश्वर पुजाराही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीची विकेट वादात सापडली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या मुंबई कसोटीत कर्णधार विराट कोहलीने एजाज पटेलच्या चेंडूवर पुढे जाऊन बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंच अनिल चौधरी यांनी त्याला आऊट दिले. भारतीय कर्णधाराने लगेच रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला, हे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले नाही. नियमानुसार, टीव्ही अंपायर वीरेंद्र शर्मा यांना फील्ड पार्टनरचा निर्णय स्वीकारावा लागला, ज्यामुळे कोहली खूप संतापलेला दिसत होता. यावर त्याने अंपायर नितीन मेनन यांच्याशीही संवाद साधला आणि त्याची निराशा स्पष्टपणे दिसून आली. टीव्ही कॅमेऱ्यात तो ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत उभा असल्याचे दिसले, ज्यामध्ये तो या निर्णयाने खूपच निराश दिसत होता.
हेही वाचा – IND vs NZ: “हा थर्ड अंपायर आहे की…”; विराट कोहलीला आऊट दिल्याने परेश रावल संतापले
विराट कोहलीच्या या विकेटवर समालोचकांनीही निराशा व्यक्त केली. या विकेटवर सोशल मीडियावरही जोरदार टीका झाली. चाहते अंपायरवर प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने आपला निकाल देत कोहली नाबाद असल्याचे सांगितले. विराट कोहली आऊट झाल्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना वॉनने लिहिले, ‘नॉट आऊट.’
सलामीवीर मयंक अग्रवालच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद २२१ धावा केल्या आहेत. भारताने ८० धावांत तीन विकेट गमावल्या होत्या, मात्र मयंकच्या शतकाने संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. तो १२० धावांवर खेळत आहे. २५ धावा केल्यानंतर वृद्धिमान साहा दुसऱ्या टोकाला त्याच्यासोबत उभा आहे. न्यूझीलंडसाठी मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने चारही विकेट घेतल्या.