IND vs NZ 1st test Match Scorecard: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्यात डावात भारतीय संघ बॅकफूटवर गेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने कसोटी क्रिकेटमधील घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. भारतीय संघ अवघ्या ४६ धावांवर ऑलआऊट झाला आहे. ज्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांना विश्वास बसत नाही. एकीकडे भारताने लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला तर दुसरीकडे इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेक होऊ शकली नाही, दुसऱ्या दिवशी झालेल्या नाणेफेकीचा निकाल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण टीम इंडियासाठी हा निर्णय जणू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखा होता. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या ४६ धावांवर ऑलआऊट झाली आणि पुढे काय झालं, इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉन भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. वॉनने भारतीय क्रिकेट चाहत्यांना खडे बोल सुनावले, पण चाहत्यांच्या प्रत्युत्तराने त्याची बोलती बंद केली.
मायकेल वॉनने एक्सवर पोस्ट करत लिहिले, भारतीय संघाच्या चाहत्यांनो यातली चांगली बाजू बघा… कमीत कमी तुम्ही ३६ धावांच्या तरी पुढे गेलात… भारतीय संघ यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३६ धावांवर ऑलआऊट झाला होता.
मायकेल वॉनच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वॉनला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये कोणीतरी आठवण करून दिली की “इंग्लंड संघाने २०१०-११ पासून ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.” याउलट भारताने ऑस्ट्रेलियाला सलग दोन कसोटी मालिकेत पराभूत केले होते. एका चाहत्याने सांगितले की त्याचे इंग्लंडच्या चाहत्यांनो तुम्हीही यातील चांगली बाजू बघा, भारताचा पराभव साजरा करतानाच पाकिस्तानकडूनही इंग्लंडचा पराभव होऊ शकतो.
हेही वाचा – IND vs NZ : भारताचा ४६ धावांत खुर्दा; हेन्री-विल्यमसमोर लोटांगण
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारताचे पाच फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. ज्यात विराट कोहली, सर्फराझ खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे शून्यावर बाद झाले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १३.२ षटकांत १५ धावांत ५ विकेट घेतले, तर विल्यम ओ’रुकने चार विकेट घेतल्या. भारतासाठी ऋषभ पंतने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, जो २० धावा करून बाद झाला.