भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वन-डे मालिकेत धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर शमीने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवातही चांगल्या पद्धतीने केली आहे. नेपियर येथील पहिल्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या वन-डे क्रिकेटमधील बळींचं शतक पूर्ण केलं आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलचा दुसऱ्याच षटकात त्रिफळा उडवत शमीने आपल्या बळींचं शतक पूर्ण केलं. यासोबत शमीने आपल्या नावावर एका ऐतिहासीक विक्रमाचीही नोंद केली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम शमीने आपल्या नावे केला आहे.

शमीने इरफान पठाणच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. पठाणने 59 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. शमीने आपल्या 56 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली. शमीने इरफान पठाण, झहीर खान, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ या सर्व दिग्गजांनाही यावेळी मागे टाकलं. गप्टीलला माघारी धाडल्यानंतर थोड्याच वेळात शमीने कॉलिन मुनरोचाही त्रिफळा उडवत यजमान संघाला दुहेरी धक्का दिला.